Rajgad Fort Accident: राजगडावर थरार! पायवाट चुकल्याने पर्यटक ४५ फूट खोल दरीत कोसळला; पाहा नक्की काय घडलं?
Rajgad Fort Accident: हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे दोन तास शर्थीचे प्रयत्न; स्थानिक आणि पर्यटकांच्या मदतीने जखमी तरुणाला सुखरूप बाहेर काढले.

Rajgad Fort Accident – राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा चुकीच्या वाटेने गेल्यामुळे भीषण अपघात झाला. जळगाव येथील अविनाश श्रावण बागुल (वय २५) हा युवक आपल्या कुटुंबासोबत राजगड दर्शनासाठी आला होता. बालेकिल्ल्याकडे जात असताना मुख्य रहदारीचा मार्ग सोडून तो चुकून दुसऱ्या पायवाटेने गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो सुमारे ४५ ते ५० फूट खोल दरीत घसरत गेला.
सुदैवाने खाली असलेल्या एका मोठ्या झाडाला तो अडकल्याने त्याचा जीव वाचला. मात्र या अपघातात त्याच्या पाठीच्या मणक्याला तसेच मान व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती तत्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. तब्बल दोन तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर रेस्क्यू पथकाने युवकाला सुरक्षित बाहेर काढले.
त्यानंतर त्याला पोलीस प्रशासन व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. या बचाव मोहिमेत तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरगे, योगेश गोपी, वैभव भोसले, दिलीप तळेकर, अनिल रेणुसे आणि विशाल पिलावरे यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच प्रतीक सावंत, रोहित खबाले या पर्यटकांनी आणि पोलीस पाटील सारिका दरडीघे यांनीही बचावकार्यात महत्त्वाची मदत केली.




