राजस्थानमध्ये मुसळधार

पुरात शाळेतील 350 मुलांसह शिक्षक अडकले

चित्तोडगढ/नवी दिल्ली – राजस्थानात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून चित्तोडगड जिल्ह्यात राणा प्रताप सागर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केल्याने पूर आला आहे. या पुरात एका शाळेतील 350 विद्यार्थी आणि 50 शिक्षक होते. रस्ते बंद झाले आणि हे सर्वजण 24 तास शाळेतच अडकले. या विद्यार्थी-शिक्षकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून करत आली आहेत.

तसेच शेजारच्या मध्य प्रदेशातही पावसाची संततधार सुरूच आहे. तेथेही सीमाभागात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. चित्तोडगडच्या या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरची वाहतूकही थांबवण्यात आली आहे. प्रशासनाचे बचावकार्य सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना शाळेतच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह पश्‍चिम मध्यप्रदेशातील काही भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 1-2 दिवसात या भागात अतिवृष्टी संभवते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पश्‍चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अंदमान निकोबार द्विपसमूह, आसाम आणि मेघालयातही काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, करिकाल, आंध्रप्रदेशची सागरी किनारपट्टी, यानम आणि गुजरातच्या काही भागांमध्येही पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या काळात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्‍यता असून बिहार, झारखंद, ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.