राजस्थान विधानसभा निवडणुकीला रंजक वळण; काँग्रेसचे पाच नेते भाजपच्या संपर्कात?

जयपूर – राजस्थान विधानसभेची निवडणूक आता रंजक वळणावर येताना दिसत आहे. कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या बालेकिल्ल्यात तुटत आहेत. ज्योती मिर्धा, ज्योती खंडेलवाल आणि सुभाष महारिया यांनी 2019 साली कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता, 2019 ची लोकसभा निवडणूक कॉंग्रेसच्या तिकिटावर लढलेले पाच नेते येत्या दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
यापैकी उदयपूर विभाग आणि हडोती विभागातील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये कॉंग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता, हे विशेष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड लाटेत कॉंग्रेसचे नेते पत्त्याच्या घरासारखे कोसळले. या निवडणुकीत भाजप उमेदवारांना 59 टक्क्यांहून अधिक मते मिळाली, तर कॉंग्रेसला केवळ 35 टक्के मते मिळाली.
झोटवाडा विधानसभा आमदार लालचंद कटारिया यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. कटारिया यांनी सांगितले की, त्यांनी दोन वर्षांपूर्वीच याबाबत हायकमांडला सांगितले होते. 2019 मध्ये लोकसभेत कॉंग्रेसच्या दारूण पराभवानंतर कटारिया यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामाही दिला होता. मात्र त्यानंतर हायकमांडने मन वळवल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता. आता भाजपच्या वाटेवर असलेल्या पाचही नेत्यांची नावे एक ते दोन दिवसांत समोर येतील, असे राज्य भाजपाने म्हटले आहे.





