राज ठाकरेंचा प्रस्ताव अन् उद्धव ठाकरेंनी ठेवली अट; म्हणाले “महाराष्ट्र हितासाठी किरकोळ वाद…”

Uddhav Thackeray And Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी साद घातली आहे. यावर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची ऑफर स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. उद्धव ठाकरे आज श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळ, दादर येथे आयोजित केलेल्या भारतीय कामगार सेनेच्या ५७ व्या वार्षिक सभेत बोलत होते. मात्र यावेळी त्यांनी एक अट ठेवली आहे.
किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार – उद्धव ठाकरे
“आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे”, असं आवाहन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी साद घातली आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं.”
पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा,आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“माझ्याकडून भांडणं नव्हतीच. पण जी काही होती ती मिटवून टाकली. पण महाराष्ट्राचे हित ठरवा. सर्व मराठी माणसाने ठरवायचे, माझ्यासोबत जायचे की भाजप, गद्दार सेनेसोबत जायचे? कुणासोबत जाऊन मराठी, हिंदुत्वाचे हित होणार आहे, ते ठरवा. मग काय तो पाठिंबा द्यायचा तो द्या. बिनशर्त पाठिंबा दिला तरी चालेल. महाराष्ट्राचे हित ही एकच अट आहे. चोरांना कळत-नकळत पाठिंबा द्यायचा किंवा प्रचार करायचा नाही, ही आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घ्यायची. त्यानंतर टाळी द्यायची हाळी द्यायची.” Uddhav Thackeray And Raj Thackeray |
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती.
पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असे राज ठाकरे यांनी म्हंटले होते.
हेही वाचा :
‘एल-२ एम्पुरान’ ओटीटीवर पाहता येणार; सुपरस्टार मोहनलालने दिली अपडेट




