राज ठाकरेंची छगन भुजबळांवर टीका अन् दुसरीकडे मुलाची ‘शिवतीर्था’ला भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नावं घेत राज ठाकरेंनी उत्तरं दिली. यामध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश होता. असे असताना दुसरीकडे भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ शिवतीर्थावर पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंकज भुजबळ आज सकाळी राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थवर पोहोचले होते. या भेटीचे नेमके कारण हे अद्याप समजू शकले नाही. मात्र राज ठाकरेंच्या सभेतील भाषणामुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना त्यातच ही भेट सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारी ठरल्याचे दिसत आहे.
दरम्यान पंकज भुजबळ यांच्याआधी भाजपा नेते कृपाशंकर सिंग राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यानंतर कृपाशंकर सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना पाठिंबा दिला गुढीपाडव्याच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच रावसाहेब दानवे यांनी त्यांची भेट घेतली होती.
राज ठाकरे यांनी भुजबळांना म्हटलं की, “भुजबळ साहेब तुम्हाला तुमचे सीए, तुमच्या माणसांमुळे, केलेल्या कामामुळे आत जावं लागलं. मोदींवर केलेल्या टीकेमुळे नाही. दोन अडीच वर्ष तुरुंगात काढल्यानंतर पहिला शपथविधी यांचा कसा होतो?”. असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.





