“दर निवडणुकीला आपला पक्ष भाड्याने द्यायचा ही राज ठाकरेंची…”; विनायक राऊतांचा घणाघात

मुंबई : सध्या राज्यामध्ये मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा लावण्यावरून राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. मनसेसोबत भाजापा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेचे रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंचा मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे अशी जहरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम आणि भोंग्यांच्या विषयावर बोलताना विनायक राऊत यांनी, “दर निवडणुकीला आपला पक्ष भाड्याने द्यायचा ही राज ठाकरेंची परंपरा मागील अनेक वर्षांपासून आहे. आज सुद्धा भाजपाच्या तालावर नाचताना केवळ आणि केवळ बंधू द्वेष सख्खा भाऊ पक्का वैरी म्हटलं जातं तसं आहे हे. आपला भाऊ म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी बसल्यानंतर आणि केवळ बसल्यानंतर नाही तर देशातील कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रशंसा झालेली आहे. आपला भाऊ मुख्यमंत्री पदी बसला हा द्वेष त्यांना सतावतोय. त्यामधून त्यांच्या मनात द्वेष निर्माण झालाय म्हणून उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी हा राज ठाकरेंचा थयथयाट सुरु आहे,” असल्याचे राऊत यांनी म्हटले.
पुढे बोलताना “राज ठाकरे यांनी शरद पवारांसारख्या देशातल्या एका आदरणीय व्यक्तीचा अपमान केलाय त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. बारामतीमध्ये नव्हते तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शरद पवारांबद्दल असणारा आदर आणि कर्तृत्व याची बरोबर कोणी करुच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवार हे माझे राजकारणातील गुरु असल्याचा आदराने उल्लेख केलाय. असं असताना काल आलेल्या राज ठाकरेंनी ज्यापद्दतीने शरद पवारांचा अवमान केलाय ते पाहता महाराष्ट्रातील जनता या अपमानाचा बदला घेणार, राज ठाकरेंची जागा काय आहे हे त्यांना दाखवून देणार,” असा थेट इशारा विनाजायक राऊत यांनी दिला आहे.
तसेच, कायदा आणि सुव्यवस्था बघिडवण्याचा डाव मनसे आणि भाजपाचा आहे. पण त्याला महाराष्ट्रची जनता भीक घालणार नाही, अशी टीका देखील विनायक राऊत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वतंत्र युद्धात देखील आपला सहभाग जाहीर करावा अशी उपरोधिक टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.





