राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला; भाजप प्रवेशानंतर संतोष धुरींचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. राज ठाकरे यांनी हिरव्या रक्त असलेल्या लोकांशी युती करून मनसे पूर्णपणे सरेंडर केल्याचा आरोप त्यांनी केला. या लोकांनी मनसेचा ताबा घेतला घेतला असल्यानेच, आमच्या पक्षाची मूळ भूमिका संपुष्टात आली आहे, असे धुरी म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेशानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धुरी यांनी सांगितले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला ५२ जागा देण्यात आल्या असल्या तरी त्यापैकी केवळ सात-आठ जागा निवडून येतील की नाही, याचीही खात्री नाही. उद्धव ठाकरे गटाने मनसेला हवी ती जागा दिली नाही. ज्या ठिकाणी ठाकरे गटाकडे उमेदवार नव्हते किंवा विद्यमान नगरसेवकाची प्रतिमा खराब झाली होती, अशाच जागा मनसेला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
माहीम, दादर, वरळी, शिवडी आणि भांडूपसारख्या मराठीबहुल भागांमध्ये मनसेला डावलण्यात आल्याचेही धुरी म्हणाले. जागावाटपाच्या चर्चेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला दोन जागा देण्याचे ठरले होते. मात्र दादरमधील वॉर्ड क्रमांक १९० आणि १९२ मनसेला मिळणार नसल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
धुरी म्हणाले की, जागावाटपाच्या प्रक्रियेत त्यांना किंवा मनसे नेते संदीप देशपांडे यांना कुठेही सहभागी करून घेण्यात आले नाही. वरून आदेश आला होता की संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले सरेंडर करायचे. त्यामुळे आम्हाला उमेदवारी किंवा वाटाघाटींमधून पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मी काही जाणार नाही…
मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी मी या संदर्भात चर्चा करताना, काही गोष्टींची कल्पना दिली. मात्र त्यांनी तू तुझा विचार कर, मी काही येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली असा दावा देखील धुरी यांनी केला. यानंतरही मी अनेकदा त्यांच्याशी बोललो मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे धुरी यांनी सांगताना संदीप देशपांडेंचं मन मोठं असल्याचे म्हणत त्यांचे कौतूक देखील केले.





