Dadar Kabutarkhana : दादरमधील कबुतरखाना वरून राडा; नेमकं काय घडलं? पाहा…
Dadar Kabutarkhana – दादरमधील कबुतरखान्याजवळ मोठा राडा झाला आहे. सध्या जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याप्रसंगी कबुतरखाना परिसरात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणारा कबुतरखान्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर बुधवारी जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याला जैन समाजाने आक्षेप घेतला आहे.
दादर येथील कबुतरखान्यावर बुधवारी सकाळी १०च्या सुमारास काही महिला कबुतरखान्याजवळ कबुतरांना खायला देण्यास आल्या आणि पोलिसांनी त्यांना असे करण्यास मज्जाव केला. यावेळी आक्रमक पवित्रा घेत त्या थेट आतमध्ये शिरल्या आणि मोठ्या प्रमाणात जैन समाजाचे बांधव जमा झाले.
यावेळी अनेक महिला आणि पुरुष दादरच्या ताडपत्री टाकलेल्या कबुतर खान्याजवळ गोळा झाले. यावेळी त्यांनी जय श्रीरामचा नारा देत आपला विरोध दर्शवला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. तसेच काही आंदोलकांनी कबुतरखान्यावर लावण्यात आलेली ताडपत्री फाडून टाकली.
दरम्यान, अनेक महिन्यांपासून दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. हा कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे. हा कबुतरखाना दादरची ओळख बनला होता. मात्र, याठिकाणी येणा-या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते.
कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. याशिवाय, हा कबुतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती.





