Raj thackeray : मराठी नववर्षानिमित्त मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची आजची परिस्थिती आणि त्याची कारणं, यावर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण भाषणामध्ये इन्स्टाग्रामवरुन लांब राहण्याचा सर्वांना सल्ला दिला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, आपल्याला आज करमणुकीमध्ये गुंतवून ठेवलं आहे. आयपीएल, कुठले तरी पिक्चर आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवलं जातंय. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून बाहेर पडा. तुम्ही गुंतवून राहिला तर सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हे सगळं आखलेलं आहे. हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात सुरू आहे. सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावं, मग कुणीही विचार करणार नाही. Raj Thackeray पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात आहे. माध्यमांची वाट लावून टाकली आहे. सरकारला विरोध केला तर जाहिराती बंद करू अशी धमकी दिली जाते. या अशा विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकला आहे. असं ते म्हणाले. नियोजनबद्ध विकास थांबला.! राज्यातील विकास, बेरोजगारी, वाढती वाहतूक कोंडी आणि बिघडलेले शहर नियोजन या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले. शहरांची सध्याची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगताना ठाकरे म्हणाले की, शहरांचा नियोजनबद्ध विकास थांबला असून कुठेही अनियंत्रित बांधकामे सुरू आहेत. इमारतींना परवानग्या देताना कोणतेही ठोस नियोजन दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली. खामेनेई यांच्या बद्दल राज ठाकरे काय म्हणाले? जो इराण देश इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर ज्या प्रकारे हल्ले होत आहेत तेव्हा आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. देशात येणारे बरंचसं तेल इराणमधून येतं, ते आपल्या रुपयामध्ये तेलविक्री करतात. खामेनेई गेल्यानंतरही आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी निषेधाचं स्टेटमेंट केलं नाही की हल्ल्यावर स्टेटमेंट केलं नाही. जो देश जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरही भारताला पाठिंबा देतो, त्या देशाच्या मागे आपण उभे राहिलो नाही याचा त्रास भविष्यात आपल्यालाच होणार आहे.