ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका

वाई – रेंगाळलेल्या परतीच्या पावसाने आधीच रब्बी हंगाम लेट झाला आहे. आता कुठे पिके उगवू लागली असतानाच दोन दिवसांपासून वाई तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अधूनमधून पावसाचा शिडकावादेखील होत आहे. या ढगाळ वातावरणाचा रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
वाई तालुक्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा, मका पिकांच्या काही क्षेत्रात पेरण्या केल्या असून अजूनही उर्वरित क्षेत्रात पेरण्या होणे बाकी आहे. तसेच बागायती क्षेत्रात पालेभाज्या, बागायती पिकांची लागवड केली आहे. पेरण्या केलेली पिके आता कुठे उगवू लागली आहेत.
वातावरणातील थंडी गायब होवून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर तांबेरा, लष्करी आळी, घाटे आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. स्ट्रॉबेरी पिकावर मर, भुरी व करपा रोग पडू शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधक उपाययोजनांचा मार्ग निवडावा लागत आहे. परंतु, या फवारणीसाठी लागणारा खर्चदेखील प्रचंड असल्याने आधीच आर्थिक संकटात असणारा शेतकरी आता आणखी संकटात सापडला आहे.





