नेपाळमध्ये पावसाचा धुमाकूळ; आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Nepal Rain Update | नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी काठमांडूमध्ये शनिवारी झालेल्या या मुसळधार पावसाने गेल्या 54 वर्षांचा विक्रम मोडला. यापूर्वी असा पाऊस 1970 मध्ये झाला होता. भूस्खलन आणि पुरामध्ये नेपाळमध्ये 112 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 68 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 3000 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. काठमांडूमधील 226 गावे पाण्याखाली गेले आहेत. सध्या देशातील 63 ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक झाले आहेत. नेपाळमध्ये अनेक भागात विजेचा पुरवठा खंडित झाला आहे.
विक्रमी पावसाची नोंद
गेल्या 24 तासांपासून खोऱ्यातील पावसाने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी गेल्या 24 तासांत काठमांडूमध्ये 239.7 मिमी पाऊस झाला. 2002 मध्ये 177 मिमी पावसाची नोंद झाली होती. झापा जिल्ह्यात शुक्रवारी 299 मिमी पावसाची नोंद झाली.
नेपाळमध्ये बहुतांश ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे नेपाळमधील सर्व शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचे आणि नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
देशाच्या अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते विस्कळीत झाले आहेत. देशातील 60 हून अधिक राष्ट्रीय महामार्ग रखडले आहेत. शेकडो घरे आणि पूल वाहून गेले. शेकडो कुटुंबे विस्थापित झाली. रस्ते बंद झाल्याने हजारो प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
काठमांडूमध्ये 226 घरे पाण्याखाली
मध्य आणि पूर्वेकडील जिल्ह्यांना पूर, पाऊस आणि भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काठमांडू खोऱ्यात मोठे नुकसान झाले आहे. येथे किमान 37 लोकांचा मृत्यू झाला. काठमांडूमध्ये 226 घरे पाण्याखाली गेली आहेत. तर कावरे जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण बेपत्ता झाले आहेत.
पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे काठमांडूला जाणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. तसेच नेपाळच्या हवामान खात्याने सलग चार दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. साधारण 56 जिल्हयांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.




