India-Nepal Relations – भारत आणि नेपाळ या शेजारी राष्ट्रांमधील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याच्या गरज असल्याचे नेपाळचे भारतातील राजदूत डॉ. शंकर प्रसाद शर्मा यांनी म्हटले. ठाणे येथे आयोजित भारत-नेपाळ व्यापार कार्यक्रम आणि व्यापार प्रोत्साहन उपक्रमामध्ये ते बोलत होते. दोन्ही देशांतील महत्त्वाचे मान्यवर, व्यावसायिक नेते आणि उद्योगातील संबंधित घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यातून अर्थपूर्ण जनसंपर्क आणि भागीदारीविषयक चर्चांसाठी एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध होईल. दोन्ही देशांच्या व्यापारी समुदायांनी परस्पर विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य आणि भागीदारीच्या नवीन संधी शोधल्या पाहिजेत, असे शर्मा म्हणाले. या क्षेत्रातील भारताच्या एकूणच धोरणात्मक हितांच्या दृष्टीने नेपाळ हे राष्ट्र अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच दोन्ही देशांच्या नेत्यांनी अनेकदा या दोन राष्ट्रांमधील प्राचीन रोटी-बेटी संबंधांचा आवर्जून उल्लेख केला आहे. नेपाळ वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून असते. नेपाळला समुद्रापर्यंत जाण्याचा मार्ग भारतामधूनच उपलब्ध होतो. तसेच आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा बहुतांश हिस्सा नेपाळ हे भारताकडून किंवा भारतामार्फतच आयात करतो.