Balendra Shah : नेपाळमध्ये बालेंद्र शाह यांनी घडवला इतिहास ! ‘एवढ्या’ जागा जिंकत ठरला मोठा पक्ष
नेपाळमध्ये माजी गायक आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे नेते बालेंद्र शाह (Balendra Shah) यांनी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

Balendra Shah : नेपाळमध्ये माजी गायक आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे नेते बालेंद्र शाह (Balendra Shah) यांनी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. नेपाळमधील प्रस्थापित राजकीय पक्षांना पिछाडीवर टाकून या पक्षाने देशाला नवीन युवा नेतृत्व दिले आहे.
रावी लामिछाने यांनी २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती. आरएसपी या पक्षाने संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनिधी गृहातल्या प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या १६५ मतदार संघांपैकी ११७ जागांवर विजय मिळवला आहे. अजूनही या पक्षाचे उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहेत. आतापर्यंत १६५ पैकी १५२ जागांवरील मतमोजणी पूर्ण झाली असून तेथील निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत.
नेपाळी कॉंग्रेस हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून या पक्षाला जेमतेम १७ जागांवर विजय मिळाला आहे. माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाइड मार्क्सवादी-लेनिनवादी) पक्षाला जेमतेम ७ जागांवर विजय मिळवता आला आहे. हा पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहे. नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने ७, श्रम संस्कृती पार्टीने २ तर राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीने एका जागेवर विजय मिळवला आहे.
याशिवाय एक अपक्ष उमेदवारही विजयी झाला. विजयी झालेल्यांमध्ये १० महिलांचाही समावेश आहे. यात आरएसपीच्या ९ आणि नेपाळी कॉंग्रेसच्या एका उमेदवार महिलेचा समावेश आहे. पंतप्रधानपदाचे दावेदार समजले जात असलेल्या के.पी. शर्मा ओली यांच्याशिवाय नेपाळी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष गगन तापा हे दोघेही पराभूत झाले आहेत.
जनतेचा कौल बालेंद्र यांच्या बाजूने…
आरएसपीने ज्या ठिकाणी विजय मिळवला, त्यामध्ये काठमांडू खोऱ्यातल्या ३ जिल्ह्यांमधल्या १५ मतदार संघांचा समावेश आहे. बालेन नावाने प्रसिद्ध असलेल्या ३५ वर्षीय बालेंद्र शाह यांनी चारवेळा पंतप्रधान राहिलेल्या आणि एकेकाळी सत्तारुढ पक्ष असलेल्या सीपीएन-यूएमएल पक्षाचे प्रमुख के.पी. शर्मा ओली यांचा ५० हजारांपैक्षा जास्त मतांनी पराभव केला. ही त्यांची सर्वात लक्षणीय कामगिरी ठरली.
प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला कंटाळून युवा पंतप्रधानाला संधी देण्याची जनतेच्या मागणीला अनुसरून बालेंद्र शाह हेच आता नेपाळचे पंतप्रधान होणार आहेत. ते देशाचे पहिले मधेशी पंतप्रधान असतील. त्यांच्या समोर देशाची ढासळणारी अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्याशिवाय पाश्चात्य देशांचे बाहुले न होण्याचेही आव्हान असणार आहे.





