पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला, कोयना धरणातून विसर्ग सुरुच

पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जुलै संपेपर्यंत अतिवृष्टीची धाकधूक कायम राहणार असल्याचे चित्र आहे. कोयना धरणातून विसर्ग सुरुच असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पाटण तालुक्यात 22 जुलै 2020 रोजी बेंदूर सणादिवशी अतिवृष्टी झाली होती.
ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने आंबेघर तर्फ मरळी, मिरगाव, ढोकावळे, वाजेगाव या गावांमध्ये मध्यरात्री भूस्खलन होऊन, घरे जमिनीत गाडली गेली होती. त्या दुर्घटनेत 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला होता. अशी नैसर्गिक आपत्ती यापूर्वी तालुक्यात कधीही झाली नव्हती.
2005 ते 2006 साली जुलै महिन्यातच अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी कोयना धरण तुडुंब भरले होते. पाऊस थांबत नसल्याने धरणातून तब्बल एक लाख 20 हजार क्युसेक विसर्ग करावा लागला होता. त्यामुळे तालुक्यातील 50 ते 60 गावे संपर्कहीन झाली होती. या घटनांपासून प्रशासनाने बोध घेतला असून, यापुढे धरणातील पाण्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करण्याचा आणि धरण काठोकाठ भरून ठेवायचे नाही, असा निर्णय झाला.
यंदा पावसाळा सुरू होताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाची बैठक घेऊन, धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे जुलैमध्ये पाऊस कमी असून आणि धरणात केवळ 70 टक्के पाणीसाठा असूनही विसर्ग केला जात आहे. आता पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवक वाढणार आहे.





