Pune District : पूर्व हवेलीत पावसाची हजेरी
Pune District : गेल्या काही दिवसांपासून परिसरात कडक उन्हामुळे उकाडा जाणवत होता. पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली होती, तर अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला होता.

सोरतापवाडी : गेल्या तीन महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूर्व हवेलीतील शेतकर्यांना अखेर अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. रविवार, दि. 1 नोव्हेंबरच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंत सुरू होता. कदमवाकवस्तीपासून उरुळी कांचनपर्यंतच्या अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात कडक उन्हामुळे उकाडा जाणवत होता. पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली होती, तर अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला होता. पाण्याची परिस्थिती गंभीर होत असताना झालेल्या या पावसामुळे शेतीला काही प्रमाणात आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. शेतातील जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने मका, ज्वारी आणि गहू या रब्बी पिकांच्या पेरणीला लवकरच वेग येण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार असून, जनावरांच्या चार्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असे शेतकरी विजय टिळेकर आणि दत्तात्रय चौधरी यांनी सांगितले. दमदार पावसामुळे ज्वारीच्या पेरणीला लवकरच सुरुवात होईल. तसेच विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ होण्यास मदत होईल, असे शेतकरी सुभाष कड यांनी सांगितले.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. पालेभाज्यांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असली, तरी तीन महिन्यांच्या पावसाच्या खंडानंतर झालेल्या पावसामुळे शेतकरी या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाऊस लांबल्याने चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. आता चारा पिकांना या पावसाचा फायदा होण्याची अपेक्षा असल्याने पशुपालकांमध्येही समाधान आहे.
पूर्व हवेलीत तीन महिन्यांनंतर झालेल्या पावसामुळे ज्वारी आणि गहू पिकांना संजीवनी मिळणार आहे. शेतीतील काही पिकांचे या पावसामुळे नुकसान झाले असले, तरी पुढील हंगामाच्या नियोजनासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नुकसान झाले तरी शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत आहे.
– दत्तात्रय चौधरी, प्रगतिशील शेतकरी, पेठगाव





