Rain : ढगाळ वातावरणात पावसाची हजेरी
Rain :

ऑक्टोबर हीटपासून तूर्त दिलासा; आणखी दोन दिवस पावसाची शक्यता
Rain : शहरात सोमवारी (दि. १९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जाणवत असलेल्या कडक ऊन आणि उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणासह झालेल्या पावसामुळे ऑक्टोबर हीटने हैराण झालेल्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला.
हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंदाजात शहरात पावसाची शक्यता वर्तवली होती. उद्या, मंगळवार आणि परवाही संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शहरात सोमवारी कमाल तापमान ३५.१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दुपारपासून उकाडा वाढल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवत होता. त्यानंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येते दोन दिवस सकाळी आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहण्याची, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गुरुवारपासून शहरात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज असून, त्यानंतर कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी दिवसांत उकाडा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.





