FDA: एफडीएकडून साडे नऊ टन पनीर, खवा जप्त
FDA:

कसबा पेठ, बावधन, बिबवेवाडीत छापे; बहुतेक पदार्थ कर्नाटकातून पुण्यात
FDA: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी पहाटे पुण्यात मोठी कारवाई केली. कर्नाटकातून पुण्यात आलेला ९ हजार किलो पनीर आणि ४४० किलो खवा असा एकूण ९ हजार ४४० किलो (९.४४ मेट्रिक टन) खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला.
या साठ्याची अंदाजे किंमत २८ लाख ४० हजार ८०० रुपये आहे. बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडी परिसरात सकाळी सहा वाजल्यापासून ही कारवाई सुरू होती.
बावधन येथे एका वाहनातून ३ हजार २०० किलो पनीर जप्त करण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ९ लाख ६० हजार रुपये आहे. कसबा पेठ येथे ३ हजार ४० किलो पनीर जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ९ लाख १२ हजार रुपये आहे.
बिबवेवाडी येथील वाहनातून २ हजार ७६० किलो पनीर जप्त करण्यात आले. या पनीरची अंदाजे किंमत ८ लाख २८ हजार रुपये आहे. याशिवाय, कसबा पेठेतील डेंगळे पूल परिसरातील शिवशंकर डेअरी येथून ४४० किलो खवा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत १ लाख ४० हजार ८०० रुपये आहे. अशा प्रकारे तीन ठिकाणांहून पनीर आणि एका आस्थापनेतून खवा जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या खाद्यपदार्थांची अनियंत्रित तापमानात वाहतूक व साठवणूक केली जात असल्याचे, तसेच त्यांची खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे पदार्थ मानवी सेवनासाठी असुरक्षित असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत पुढील कार्यवाही सुरू असल्याचे एफडीऐचे म्हणणे आहे.
दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री सुरक्षित पद्धतीने होत आहे की नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. जप्त केलेले पदार्थ भेसळयुक्त असल्याचे अद्याप अहवालातून सिद्ध झालेले नाही. त्यांची सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत पुढील तपासणीनंतरच निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.





