Maharashtra Weather : राज्यात पावसाचा जोर वाढला ! मुसळधार सरींसह यलो अलर्ट, मुंबई-कोकण-मराठवाड्यात कसं असेल हवामान?

Maharashtra Weather Update : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून, राज्यभरात हलक्या ते मध्यम सरींनी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला आहे. आज (9 ऑगस्ट) पहाटेपासून मुंबईसह अनेक भागांत पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मराठवाडा, विदर्भ आणि कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला असून, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामानाचा अंदाज काय?
हवामान खात्याच्या माहितीनुसार, फिरोजपूर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. कर्नाटक आणि बांगलादेश-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांमुळे 13 ऑगस्टपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकण येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
तसेच मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ आणि दमट वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी तर दुपारनंतर किंवा संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो. मरिन ड्राइव्ह, कुलाबा, दादर, सायन, अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, भांडुप येथे पावसाचा प्रभाव जाणवेल.
सखल भागांत (हिंदमाता, अंधेरी सबवे, बीकेसी) पाणी साचण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे गुरुवार-शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.
मान्सूनचा ‘ब्रेक’ आणि तज्ज्ञांचे मत
हवामान तज्ज्ञांनुसार, ऑगस्टमध्ये ‘ब्रेक-इन-मॉन्सून’मुळे पावसात 10 दिवसांची खंड पडते, ज्यामुळे उकाडा वाढला होता. पुढील चार दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे, परंतु कोकण, मराठवाडा आणि विदर्भात 8 ते 15 ऑगस्टपर्यंत पाऊस कायम राहील. तापमान 32-33 अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा आणि चंद्रपूर येथे 35.5 अंशांपर्यंत कमाल तापमान नोंदवले गेले. पावसामुळे वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.





