पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, पालघर येथे उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. म्हणून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दि. २१ मे रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात मेघ गर्जनेसह विजेचा कडकडाटासह आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तळ कोकणात ठाणे आणि रायगड येथे उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. २२ आणि २३ मे रोजी विदर्भात बहुतांश ठिकाणी तर २२ मे रोजी कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळीवाऱ्यासह पाऊस होईल. २२ ते २५ मे दरम्यान अकोला येथे उष्णतेचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान या काळात कोरडे राहील. या काळात पुण्यात दिवसभर आकाश निरभ्र राहील मात्र सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.