Punjab bandh : रेल्वे, बससेवा आणि व्यवहार झाले ठप्प; शेतकऱ्यांच्या बंदमुळे पंजाबमधील जनजीवन विस्कळीत

Punjab bandh – विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी पंजाब बंद पुकारला. त्या ९ तासांच्या बंदमुळे पंजाबमधील जनजीवन विस्कळीत झाले. रेल्वे आणि बससेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. त्याशिवाय, अनेक ठिकाणी व्यवहारही ठप्प झाले.
पंजाब-हरियाणा सीमेवर फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी द्यावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेत्यांनी आठवडाभरापूर्वीच पंजाब बंदचा निर्णय घेतला. त्यानुसार, सोमवारी सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीत बंद पाळण्यात आला.
थंडीचा कडाका, दाट धुक्याची चादर आदींची पर्वा न करता शेतकऱ्यांनी अनेक रस्ते आणि महामार्गांवर धरणे धरले. त्यामुळे रस्ते वाहतूक थंडावली. बंदमुळे बहुतांश रेल्वेसेवा स्थगित ठेवण्यात आली. तसेच, बस आणि इतर वाहनेही रस्त्यांवर उतरली नाहीत. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. पंजाबमधील बहुतांश दुकाने, पेट्रोल पंप, बाजारपेठा बंद राहिल्या.
पंजाब-हरियाणा सीमेवरील खनौरी या ठिकाणी ७० वर्षीय शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल महिनाभरापासून उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवणे हाही बंदमागील उद्देश होता. बंदनंतर डल्लेवाल यांनी व्हिडीओ संदेश जारी केला.
बंद यशस्वी केल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी पंजाबमधील जनतेचे आभार मानले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. बंदला सामान्य जनतेचा पाठिंबा मिळणार नाही असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात होता. त्याला ३ कोटी पंजाबींनी उत्तर दिले, अशा प्रतिक्रिया इतर शेतकरी नेत्यांनी दिल्या.





