रेल्वे विभागाचे “लोकल’ दुखणे; फेऱ्या वाढवण्याच्या मागणीला “सर्व्हे’चा खोडा

पुणे – पुणे-लोणावळा-पुणे मार्गावरील चाकरमान्यांसाठी लोकल रेल्वे सेवा अजूनही पूर्ववत करण्यात आलेली नाही. या ट्रेन्सच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. पण, सर्व्हे करूनच फेऱ्या वाढवण्याच्या आडमुठेपणावर रेल्वे अधिकारी ठाम आहेत. यामुळे नियमित प्रवासी आणि चाकरमान्यांची मात्र ससेहोलपट होत आहे.
करोना-अनलॉकनंतर रेल्वे प्रशासनाने सर्वच प्रमुख ट्रेन्स सुरू करत हळूहळू संख्याही वाढवली. पण, पुणे-लोणावळा-पुणे लोकल सेवा अजूनही पूर्ववत झालेली नाही. करोनापूर्वी या लोकलच्या 42 फेऱ्या सुरू होत्या. पण, आता केवळ 26 फेऱ्या करून दिवस ढकलला जात आहे. प्रशासनाने सुरुवातीला 20 फेऱ्या सुरू केल्या. त्यात 9 एप्रिलपासून आणखी सहा फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर एकही फेरी वाढविली नाही.
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर गावी गेलेले नागरिक माघारी आले आहेत. तसेच शाळा-कॉलेज नियमित सुरू झाले आहेत. त्यामुळे जूनमध्ये फेऱ्या वाढविणे अपेक्षित होते. पण रेल्वे प्रशासनाने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. पुणे-लोणावळा-पुणे मार्गावर दररोज शेकडो कामगार, विद्यार्थी हजारो विद्यार्थी लोकलचा वापर करतात. पण, आता फेऱ्या अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांचे टाइमटेबल पुरते बिघडले आहे.
मी कॉलेजसाठी पिंपरी ते शिवाजीनगर प्रवास करतो. माझ्या कॉलेजची वेळ दुपारची आहे. पण, त्याचवेळी लोकल ट्रेन मिळत नाही. त्यामुळे घरातून लवकर निघावे लागते. परतीच्या प्रवासातही रेल्वेसाठी खूप वेळ वाट पाहवी लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वीप्रमाणे लोकल फेऱ्या वाढवाव्यात.
– एक विद्यार्थी
सर्व्हेच्या नावे टोलवाटोलवी
पुणे-लोणावळा-पुणे लोकल पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी प्रशासन सर्व्हे करण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. पण, आता ते ठरवूनही 3 महिने लोटले आहेत. उत्पन्नाच्या दृष्टीने हा निर्णय व्यवहार्य असला, तरी अवलंबून असलेल्या प्रवाशांची गैरसोय लक्षात घेणेही गरजेचे आहे. आता प्रवाशांची संख्या वाढूनही रेल्वेचे अधिकारी कोणत्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत? असे प्रश्न प्रवासी विचारत आहेत.





