Daund Railway Station : पुणे-दौंड रेल्वेमार्गावर मेगाब्लॅाक; २० जुलैपर्यंत अनेक रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून महत्वाचे आवाहन

Daund Railway Station : हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी नॉन-इंटरलॉकिंग आणि प्री-नॉन-इंटरलॉकिंग कामे करण्यात येत आहेत. या कामांमुळे १७ ते २० जुलै दरम्यान पुणे ते दौंड रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॅाकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या शार्टटर्मिनेट करून थांबविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी आपला प्रवास करताना नियोजनपूर्वक करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
१५ ते २० जुलै दरम्यान रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठे बदल करण्यात आले आहे. २० जुलै रोजी १७ तासांचा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक (रात्री १२ ते सायंकाळी पाचपर्यंत ट्रॅफिक ब्लॉकसह) घेण्यात येणार आहे. ह्या ब्लॉकच्या काळात प्रवास करताना गाडी रद्द/उशिरा/दुसऱ्या स्थानकावरून सुरु होणार आहे, यामुळे प्रवासापूर्वी रेल्वे वेबसाइट किंवा NTES अॅपवर ताज्या वेळापत्रकाची खात्री करून प्रवास करण्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
…म्हणून रेल्वेचा ब्लॅाक
या कामाचा परिणाम अनेक प्रवासी गाड्यांवर होणार आहे. २० जुलै या दिवशी तब्बल १७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे-दौंड डेमू, दौंड-बेलवंडी, पुणे-हरंगुळ एक्सप्रेस, पुणे-सोलापूर एक्सप्रेस अशा प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. हडपसर टर्मिनलचा विकास वेगाने सुरू आहे. या टर्मिनलचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या दृष्टीने नवीन तयार करण्यात आलेल्या रेल्वेलाइन मुख्य मार्गाला जोडण्याचे काम केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हा ब्लॅाक घेणात येणार आहे.





