Raigad News: प्रशासकीय भवनातील लिफ्ट अद्याप बंदच! १५ ऑगस्टला बेमुदत उपोषणाचा इशारा
Raigad News: सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; १४ ऑगस्टपर्यंत लिफ्ट सुरू न झाल्यास १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा.

Raigad News – शहरातील नवीन प्रशासकीय भवनात बसविण्यात आलेली लिफ्ट अद्याप कार्यान्वित न झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्याकडे निवेदन देऊनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करत १५ ऑगस्ट रोजी प्रशासकीय भवनासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
नवीन प्रशासकीय भवनात तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयासह विविध शासकीय विभाग कार्यरत आहेत. तालुक्यातील शेकडो नागरिक विविध कामांसाठी दररोज येथे येत असतात. मात्र इमारतीला दोन मजले असूनही लिफ्ट सेवा सुरू नसल्याने नागरिकांना पायऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.
याबाबत १५ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले होते. तसेच तहसील कार्यालय आणि संबंधित विभागांनी सकारात्मक अहवालही सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, १४ ऑगस्टपर्यंत लिफ्ट सुरू करण्याबाबत मंजुरी व कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून प्रशासकीय भवनासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल.
“लिफ्टचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात असल्यास कार्यकारी अभियंत्यांना आवश्यक आदेश दिले जातील. अन्यथा नव्याने प्रस्ताव तयार करून लिफ्टचे काम पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.”
– किसन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड.
“दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वारंवार प्रशासकीय भवनात यावे लागते. लिफ्ट नसल्याने मोठा त्रास होतो. किमान रॅम्पची सुविधा तरी तातडीने उपलब्ध करून द्यावी. कुबड्यांच्या आधाराने जिने चढ-उतार करताना पडण्याची भीती कायम असते.”
– अमर साळोखे, अध्यक्ष, ॐ साई गणेश अपंग कल्याण संस्था





