Satara: अन्न व औषध प्रशासनाविरोधात दिव्यांगांचा एल्गार; रॅम्प नसल्याने संताप, बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा
Satara दि. 14 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयापासून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत लोटांगण आंदोलन काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Satara: येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आणि अन्य मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 चे उल्लंघन झाल्याचा दावा करत संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाणे तसेच पुणे व सातारा येथील दिव्यांग सक्षमीकरण अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, कार्यालयात दोन दिव्यांग कर्मचारी कार्यरत असतानाही आजपर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. एका वरिष्ठ अधिकार्याने दिव्यांग व्यक्तीशी अपमानास्पद वागणूक देत धमकावल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकार्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा विक्रीचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. गुटखा पुरवठ्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, शासकीय यंत्रणेतील कोणाचाही सहभाग आढळल्यास त्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दि. 5 ऑगस्टपासून पोलीस अधीक्षक कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयाबाहेर दररोज ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात येईल. याशिवाय शुक्रवार दि. 14 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयापासून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत लोटांगण आंदोलन काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.





