निगडीतील स्पावर छापा! वेश्याव्यवसाय प्रकरणी ६ जणांना अटक, २ महिलांची सुटका

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय चालविल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. तसेच दोन महिलांचीही सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास निगडी बस स्टॉपजवळील कोहिनूर आर्केड येथील ईगल स्पा सेंटर येथे करण्यात आली.
इसमत शराफत अली (वय 27), आर्यन उर्फ नुरुद्दीन शेख (वय 21), अलिमोद्दीन (रा. नवी सांगवी,) माऊली उर्फ ज्ञानेश्वर व्यवहारे (रा. कृष्णा नगर, निगडी), गणेश उर्फ त्र्यंबक कासिंदे (रा. शाहूनगर, चिखली), आकाश हिरामण खवले (रा. मोरे वस्ती, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिंबध कक्षातील पोलीस नाईक भगवंता चिंधू मुठे (वय ३९) यांनी गुरुवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाच्या आडून पिडीत महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्या कृत्यात ढकलण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिलांची सुटका केली. निगडी पोलीस ठाणे या प्रकरणी तपास करीत आहे.





