Koyta Attack – पिंपरी गावातील ग्रीन पार्क परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाच्या हातावर कोयत्याचा वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६मार्च) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी धिरज विशाल उल्लारे (वय १९, रा. संविधान सोसायटी, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. २७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओम विलास गोटे (वय १८, रा. भाटनगर, पिंपरी) आणि सुरज सोनु पाल्मिकी (वय १९, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी धिरज आणि त्यांचे मित्र ग्रीन पार्क येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी ओम गोटे हा त्याच्या दोन मित्रांसह तिथे आला. त्याने जुन्या वादावरून शिवीगाळ करत कोयता उपसला आणि धिरजला मारण्याचा प्रयत्न केला. धिरजला वाचवण्यासाठी त्याचा मित्र वैभव विठ्ठल भाईकट्टी याने आपला डावा हात मध्ये घातला, तेव्हा कोयत्याचा वार वैभवच्या हातावर लागून तो जखमी झाला. पोलिसांनी आरोपींकडून कोयता जप्त केला असून त्यांच्यावर शस्त्र अधिनियमानुसार कारवाई केली आहे.