राहुरी: रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नेतेमंडळीही निवडताहेत ‘लाँगकट’!

राहुरी (जयंत कुलकर्णी/अनिल देशपांडे) – आतापर्यंत अनेक वेळा नगर-मनमाड रस्ता करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण ते पाण्यात गेल्याचे वास्तव आहे. या रस्त्यासाठी टोलदेखील प्रवाशांनी भरला; पण ठेकेदार काम करून मोकळे झाले. ना या कामाला दर्जा आणि गुणवत्ता, निकष तर धाब्यावर बसविलेले. हे पाहणे आणि करणे कोण? आणि ते आता या रस्त्याबाबत ओरड करीत आहे.
राजकीय जोडे बाजूला ठेवून उत्तरेतील नेते व पुढार्यांनी किमान जिल्ह्याच्या मुख्यालयात ये-जा करण्यासाठी वापर होत असलेल्या नगर-मनमाड रस्त्याकडे वेळीच पाहिले असते, तर आज शेकडो बळी गेले नसते. आजही नेतेमंडळी नगर-मनमाड रस्त्याच्या अवस्थेमुळे वैजापूर, गंगापूर मार्गे औरंगाबाद रस्त्याने, तर काही आळेफाटामार्गे नगरला ये-जा करीत आहे. किलोमीटर वाढतात; पण प्रवास सुरक्षित होत आहे. पण सर्वसामान्यांना परवडत नाही, म्हणून त्यांना या खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे.
सन 1999मध्ये चौपदरीकरणाच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. परंतु प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश मिळण्यासाठी 2007 साल उजडावे लागले. काम पूर्ण होण्यास तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित होता. मात्र, चौपदरीकरणाचा प्रस्तावही आठ वर्ष रेंगाळला. त्यामुळे त्याच्या खर्चात अनेक कोटींनी वाढ झाली. वास्तविक पाहता या चौपदरीकरण प्रस्तावाच्या वेळेस या महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन सहापदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत होती. परंतु संबंधित यंत्रणांनी या मागणीकडे लक्ष दिले नाही.
वास्तविक पाहता चौपदरीकरणाच्या कामात झाडे लावणे, वीज, दूरध्वनी वाहिनी टाकताना आदी सुविधा उपलब्ध करून देताना भविष्यात सहापदरीकरण करावे लागू शकते, याचा विचार होणे गरजेचे होते. मात्र, ते झाले नाही. चौपदरीकरण झाल्यानंतरही खासगी टोल वसुलीच्या माध्यमातून केवळ टोल वसुलीकडे लक्ष दिले गेले. वास्तविक पाहता एक खड्डा वेळीच बुजवला गेला असता, तर त्याने पुढील शंभर खड्ड्यांच्या निर्मितीची प्रक्रिया थांबवली असती. परंतु अगदी चौपदरीकरण झाल्यानंतर या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही. केवळ टोल वसुली हाच प्राधान्याचा विषय राहिला आणि त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था अधिक वाढत गेली.
या रस्त्याच्या खराब होण्याची कारणे लक्षात घेतली गेली पाहिजेत. या रस्त्याच्या चौपदरीकरण करतेवेळी साईडपट्टीत कच्च्या स्वरूपातले काम असते. तेथे पावसाचे पाणी साठते आणि ते पावसाचे पाणी केवळ साईडपट्टीच खराब करत नाही, तर डांबरीकरणाचा रस्ता ही खराब करण्यास कारणीभूत ठरते.
या रस्त्यावरील वाढलेली मोठ्या प्रमाणावरील वाहतूक रस्ता खराब होण्याचे कारण आहेच. जिथे रस्त्याकडील शेतांपेक्षा रस्ता कमी उंच आहे, तिथे शेत जमिनीत, पिकांना दिले जाणारे पाणी झिरपून रस्ता खराब होण्याची प्रक्रिया वेगात वाढते. मात्र, जिथे शेतजमिनीपेक्षा महामार्ग उंचावर आहे, तिथे या प्रक्रियेला बाधा पोहोचते आणि त्यामुळे तेथील महामार्गची स्थिती त्या तुलनेत चांगली असते. सांडपाण्याची व्यवस्था हा एक महत्त्वाचा भाग आहे.
रस्त्यावर पडणारे पाणी तातडीने वाहून गेले, तर खड्डेनिर्मितीस प्रतिबंध झाला असता. मात्र, तसे होत नाही. अनेक ठिकाणी जवळपासच्या भागातील पाणी रस्त्यावरच येते. ते तेथेच साठून राहते आणि त्यामुळे महामार्ग खराब होण्याच्या प्रक्रियेला वेग मिळतो. या महामार्गाच्या खालच्या बाजूला काळी कसदार जमीन आहे. टणक मजबूत भूभाग नाही. त्यामुळे काळी कसदार जमीन असल्यामुळे रस्ते खचतात आणि एक खचलेला खड्डा वेळीच न दुरुस्त झाल्यामुळे अनेक खड्ड्यांच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो. पावसाचे पाणी, सांडपाणी यांचा योग्य निचरा हा प्राधान्याचा विषय असला पाहिजे.
जागतिक बँकेच्या अलीकडील सर्वेक्षणानुसार हा रस्ता सहापदरी होणे आवश्यक आहे. सहा पदरी प्लस साईड गटार याचा विचार करता या बहुतांश रस्त्यालगत असलेले शहरीकरण, जलवाहिन्या, गॅसवाहिनी त्यामुळे आता असा विस्तार करणे शक्य होणार नाही. किंबहुना ते अधिक खर्चाचे होणार आहे. त्यामुळेच चौपदरीकरण अधिक साईडपट्ट्याचेही मजबुतीकरण व डांबरीकरण करून तो सहापदरी होऊ शकेल, अशा पद्धतीनेच विकसित करण्याची गरज आहे. गुणवत्ता नियंत्रण व देखभाल दुरुस्ती या मूलभूत कामाबरोबरच आणखीन काही मूलभूत पायाभूत त्रुटींमुळे या रस्त्याची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. या त्रुटी दूर झाल्या, तरच कोट्यवधी रुपये खर्चून होणारा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणण्यासारखा राहील.





