Prajakta Tanpure : अपक्ष की पक्षचिन्ह? प्राजक्त तनपुरेंच्या निर्णयाकडे लक्ष! मुंबईत शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक
Prajakta Tanpure : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार की अपक्ष हा सस्पेन्स कायम आहे.

Prajakta Tanpure : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर वंचितने अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील अनेकजण इच्छूक असल्याने उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्या पक्षाचा उमेदवार द्यावा, असे म्हटले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडावी, असा म्हणण्याचा उद्देश संजय राऊत यांचा होता. मात्र, काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम असून, उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याचे सूतावोच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत.
त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकासीठी कंबर कसल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र ते पक्षाच्या चिन्हाऐवजी ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरु आहे. तनपुरे यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे सस्पेन्स कायम आहे.
त्यातून महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण होऊन बहुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनेकजण इच्छूक आहेत. परिणामी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे.
शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक
दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांनी आज मुंबईतील त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्राजक्त तनपुरे पक्षाकडून निवडणूक लढण्यास तयार नसतील तर पर्यायी उमेदवार म्हणून कोणाला रिंगणात उतरवायचे याबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.
लंकेच्या विधानाने चिंता वाढवली
निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. नुकतीच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे निलेश लंके यांनी “राजकारणात वेळ आणि काळ खूप महत्त्वाचा असतो”. असे विधान केल्याने महायुती आणि भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





