राहुल शेवाळे प्रकरण : …म्हणून रूपाली पाटलांवर होणार कडक कारवाई; रूपाली चाकणकरांचा थेट इशारा

मुंबई – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने शोषणाचे आरोप केले आहेत. सोमवारी राहुल शेवाळे यांनी एक पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्याविरोधातील आरोपांमागे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य राहुल शेवाळे यांनी यावेळी केलं.
दरम्यान, राहुल शेवाळे यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शेवाळेंचा चांगलाच समाचार घेतला होता. ‘राहुल शेवाळे स्वत: शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. राहुल शेवाळे यांना असं बोलताना लाज वाटली पाहिजे!’, असं रुपाली पाटील म्हणाल्या होत्या.
यावेळी रुपाली पाटील यांनी राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करताना फेसबुक लाईव्हद्वारे पीडित महिलेचा चेहरा देखील उघड केला होता. मात्र, आता या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. राहुल शेवाळे प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे आता एकाच पक्षातील या दोन नेत्यांमध्ये चांगलाच राडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘मी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळं महिला आयोग कारवाई करू शकत नाही’, असं प्रत्युत्तर रुपाली पाटलांनी दिले आहे. तसेच, या प्रकरणातील पीडितेला संरक्षण देण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.





