Rahul Narwekar : भाजपच्या राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागणार?

मुंबई : आज राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळले होते. त्यामुळे त्यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक आणि महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने विधानसभा अध्यक्षपदावरची निवड सहजपणे होऊ शकते.
राहुल नार्वेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
विधानसभा अध्यक्ष पदाबाबत राहुल नार्वेकर यांना विचारले असता मला पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडेन. पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदा संदर्भात जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल. मला पक्षाने अनेक संधी दिली आहे आणि यापुढेही जी संधी दिली जाईल त्यानुसार काम करेन. उद्या विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. मात्र पक्षाच्या निर्णयानुसार कोणाला अर्ज भरायला सांगितला जाईल त्याला अर्ज भरावं लागेल असे राहुल राहुल नार्वेकर म्हणाले.





