लखनौ : उत्तरप्रदेशच्या सुलतानपूरमध्ये राहणाऱ्या ६० वर्षीय रामचेत या सामान्य चर्मकाराचे मागील काही महिन्यांपासून जणू भाग्यच उजळले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रोत्साहन त्याच्यासाठी वरदान ठरले आहे. आता रामचेत स्वत:चा ब्रँड (रामचेत मोची) लॉंच करण्यासाठी सज्ज होत आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल सुलतानपूरला गेले होते. त्यावेळी ते अनपेक्षितपणे रामचेत याच्या छोटेखानी दुकानात थांबले. राहुल यांनी रामचेतशी संवाद साधून त्याच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालू वर्षी फेब्रुवारीत राहुल यांनी रामचेतला थेट दिल्लीत भेटीसाठी बोलावले. त्यावेळी रामचेत याने स्वत: बनवलेल्या चपला भेट स्वरूपात कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कन्या प्रियंका यांना दिल्या. राहुल यांनी नुकतीच मुंबईतील धारावी परिसराला भेट दिली. चर्मोद्योगातील कामगार आणि उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी ती भेट झाली. त्यावेळी राहुल त्यांच्या समवेत रामचेतलाही घेऊन गेले. धारावीत राहुल यांनी रामचेतची भेट एका यशस्वी उद्योजकाशी घडवून आणली. मुंबईतून रामचेत परतला तोच मुळी नव्या आकांक्षा घेऊन. राहुल यांनी याआधीच त्याच्या कामात मदत व्हावी यासाठी त्याला एक मशीन भेट दिली. त्याचा वापर त्याने आधीच शुज बनवण्यासाठी सुरू केला आहे. आता रामचेत पर्सही बनवणार आहे. विशेष म्हणजे, स्वत:चा ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी तो सरसावला आहे. चपला-बुटांच्या दुरूस्तीमधून मला किरकोळ उत्पन्न मिळायचे. राहुल यांच्या भेटीनंतर माझ्या कमाईत लक्षणीय वाढ झाली, असे तो आवर्जून नमूद करतो. राहुल यांच्या भेटीने जीवनच पालटून गेलेला रामचेत आता उद्योजक बनेल.