Rahul Gandhi : तुम्ही वाघाला बांधू शकत नाही..! राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्लाबोल

Parliament Monsoon Session 2025 | Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये इंदिरा गांधींसारखे ५० टक्केही धाडस असेल, तर त्यांनी सभागृहात सांगावे की भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेताना, असा आरोपही केला की विमानांचे नुकसान हे सरकारमधील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे झाले आहे.
ते म्हणाले, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी २९ वेळा युद्धबंदी आणल्याचे म्हटले आहे. जर ते चुकीचे असतील, तर पंतप्रधानांनी येथे सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत. जर पंतप्रधानांमध्ये इंदिरा गांधींसारखे धाडस असेल, तर त्यांनी येथे सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत.”
ते म्हणाले, “या सभागृहातील प्रत्येकाने पाकिस्तानचा निषेध केला. ऑपरेशन सिंदूर सुरू होताच, सर्व विरोधी पक्षांनी निर्णय घेतला की आम्ही आमच्या सशस्त्र दलांसोबत आणि भारताच्या निवडून आलेल्या सरकारसोबत दगडासारखे उभे राहू. आम्हाला अभिमान आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्या पद्धतीने असायला हवे होते त्या पद्धतीने आम्ही एकजूट राहिलो आहोत.”
तुम्ही वाघाला बांधू शकत नाही – राहुल गांधी
ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही सशस्त्र दलातील लोकांशी हस्तांदोलन करता तेव्हा तुम्हाला कळते की ते भारतीय सैन्यातील आहेत. तुम्हाला कळते की ते वाघ आहेत. तुम्ही वाघाला बांधू शकत नाही… दोन शब्द आहेत, एक म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि दुसरा म्हणजे ऑपरेशनचे पूर्ण स्वातंत्र्य. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १९७१ च्या युद्धाची आणि ऑपरेशन सिंदूरची तुलना केली. १९७१ मध्ये राजकीय इच्छाशक्ती होती.” असं देखील राहुल गांधी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “(तेव्हाचे फील्ड मार्शल) मानेक शॉ यांनी इंदिरा गांधींना सांगितले होते की आम्ही उन्हाळ्यात बांगलादेशात ऑपरेशन चालवू शकत नाही, आम्हाला सहा महिने हवे आहेत. इंदिराजी म्हणाल्या की तुम्ही सहा महिने घ्या, एक वर्ष घ्या, तुम्हाला ऑपरेशनचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.”
चूक राजकीय नेतृत्वाकडून होते – राहुल गांधी
संरक्षणमंत्र्यांच्या भाषणातील एका भागाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी दावा केला की, भारत सरकारने पाकिस्तान सरकारला कळवले की, “आमच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही, आम्ही लढणार नाही, म्हणजेच ३५ मिनिटांत आत्मसमर्पण झाले.”
एका अधिकाऱ्याच्या विधानाचा हवाला देत त्यांनी दावा केला की, “सरकारने आमच्या पायलटला पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करू नका असे सांगितले. म्हणजेच पायलटचे हात बांधलेले होते. भारतीय हवाई दलाने कोणतीही चूक केली नाही, चूक राजकीय नेतृत्वाने केली आहे. त्यामुळे हवाई दलाला कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही.”





