Rahul Gandhi : जातिनिहाय जनगणना कधी अन् कशी होणार? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, या निर्णयामागे कोणताही कृतीबद्ध आराखडा नसल्याने ही जातिय जनगणना केव्हापासून करणार आणि निधीची तरतूद केव्हा करणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
राहुल गांधी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले, जातीय जनगणनेसाठी आराखडा तयार करण्यात आम्ही सरकारला आमचा पाठिंबा देतो. जातीय जनगणना ही पहिली पायरी आहे. आमचे ध्येय जातीय जनगणनेद्वारे विकासाचा एक नवीन नमुना आणणे आहे. फक्त आरक्षणच नाही. ११ वर्षे विरोध केल्यानंतर मंत्रिमंडळाने जातीय जनगणनेची घोषणा केली.
आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो, पण ती कधी होईल याची खात्री करण्यासाठी आम्हाला कालमर्यादेची आवश्यकता आहे. तेलंगणा हे जातीय जनगणनेसाठी एक मॉडेल बनले आहे, जे एक ब्लूप्रिंट असू शकते. आम्ही सरकारला जातीय जनगणनेसाठी एक चौकट देत आहोत. एक बिहारची रचना आहे आणि दुसरी तेलंगणाची आणि दोघांमध्ये खूप फरक आहे. आम्हाला जातीय जनगणनेद्वारे विकासाचा एक नवीन नमुना आणायचा आहे. आम्ही केंद्राला संस्था, सत्ता संरचना इत्यादींमध्ये ओबीसी, दलित, आदिवासींच्या सहभागाबद्दल हा प्रश्न विचारत आहोत, असे ते म्हणाले.





