“राहुल गांधी मॅन ऑफ द मॅच ठरले…” – शशी थरूर

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने अनेक ठिकाणी चेंडू मैदानाबाहेर मारला. पक्षाचे नेते राहुल गांधी मॅन ऑफ द मॅच ठरले, अशी शाब्दिक बॅटिंग कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली. राहुल यांनीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनावे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली.
यावेळच्या निवडणुकीत कॉंग्रेसने लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे बळ वाढले आहे. त्याचा संदर्भ घेऊन थरूर पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भाजपच्या अतिअहंकारी वृत्तीला मतदारांनी अयोग्य ठरवले. जनतेने दिलेल्या कौलाचा तो संदेश आहे. नवे एनडीए सरकार काही मुद्द्यांवर मजबूर सरकार ठरण्याची शक्यता आहे.
कारण, एनडीएच्या घटक पक्षांमध्ये प्रत्येक बाबीवर सहमती आवश्यक ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सरकारचे कामकाज चालवताना सल्लामसलत करण्याची फारशी सवय नाही. त्यामुळे त्यांना कार्यपद्धती बदलावी लागेल. त्यामध्ये त्यांच्या क्षमतेचा कस लागेल, असे थरूर यांनी म्हटले.
केरळमधून सलग चौथ्यांदा ६८ वर्षीय थरूर लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी पुढील निवडणूक वेळापत्रकानुसार ५ वर्षांनी झाल्यास ती स्वत: लढवण्याची शक्यता नसल्याचे सूतोवाच केले. तरूणांना संधी देण्यासाठी केव्हा दूर व्हायचे ते ठरवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.





