Chandrashekhar Bawankule : गोकुळच्या सत्तासंघर्षात राहुल गांधींची उडी; भाजपवर केला गंभीर आरोप, आता बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं…
Chandrashekhar Bawankule : या निर्णयावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Chandrashekhar Bawankule : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी राज्य सरकारकडून शासन नियुक्त चार संचालक नेमण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे.
या निर्णयावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
गोकुळच्या निर्णयावरून वादाची ठिणगी
गोकुळच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडीसाठी १४ सदस्यांचा कोरम पूर्ण होणं आवश्यक आहे. मात्र, समविचारी आघाडीच्या पॅनेलकडे प्रत्यक्षात १३ सदस्य असल्याने अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने चार शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
राहुल गांधींचा भाजपवर मतचोरीचा आरोप
गोकुळमधील घडामोडींवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. भाजप इतकी निराश का झाली आहे? सत्ता वाचवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच दूध उत्पादकांनी मतचोरी करणाऱ्यांना लक्षात ठेवावं, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळेंचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या आरोपानंतर भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. बावनकुळे म्हणाले, “गोकुळचा निर्णय आणि मागणीवर सहकार मंत्री तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारचं सहकार्य, गोकुळला केलेली मदत आणि भविष्यात मिळणारं सहकार्य लक्षात घेऊन सरकार व निवडून आलेली समिती यांच्यात समन्वय राहावा, यासाठी निर्णय घेतला असेल.”
राहुल गांधींना रॅलीतून प्रत्युत्तर देणार
दरम्यान, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी रॅली आयोजित करण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या रॅलीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या रॅलीच्या माध्यमातून राहुल गांधींना ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.





