नवी दिल्ली : मतदार यादीसंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. याच मुद्यावर चर्चेसाठी आणि राहुल गांधींना त्यांचे मत मांडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र १२ जून रोजी राहुल गांधीं यांना पाठवलेल्या पत्राला अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. हे पत्र आम्ही सर्वांसमोर सादर करत आहोत, असे केंद्रिय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, त्यांच्याकडे निवडणूक आयोगाविरुद्ध एक मोठा अणुबॉम्ब आहे, जो ते लवकरच उघड करतील. त्यावर निवडणूक आयोगाने आपले एक निवेदन जारी केले आहे. आयोगाने पत्रात काय म्हंटले? निवडणूक आयोगाने पत्रात लिहिले आहे की, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीविषयी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. भारतात निवडणूक प्रक्रिया स्वच्छ आणि अचूक पद्धतीने पार पडते. राहुल गांधी दररोज करत असलेल्या आरोपांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आयोगाने राहुल गांधींना अनेक वेळा समन्स पाठवले, परंतु त्यांनी कधीही त्याला उत्तर दिले नाही. याशिवाय, निवडणूक आयोगाने तो अहवालही खोटा ठरवला, ज्यामध्ये काँग्रेसने म्हटले होते की ६.५ लाख मतदारांपैकी १.५ लाख मतदार बनावट असल्याचे आढळले. आयोगाने माहिती दिली आहे की, राहुल गांधी सतत मत चोरीसारखे खोटे आरोप करत आहेत. या आरोपांना कोणताही आधार नाही. देशभरात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा हा अपमान आहे. काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडी बिहारमध्ये सुरू झालेल्या एसआयआर प्रक्रियेला जोरदार विरोध करत आहे. राहुल गांधींसह अनेक काॅंग्रेस नेते सतत निवडणूक आयोगावर हल्ला करत आहेत.