“राहुल गांधी यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश द्यावेत”; सात्यकी सावरकर पुणे
पुणे – लोकसभा निवडणुकीतील मतचोरीचे पुरावे सादर केल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचा अर्ज न्यायालयात सादर करून नंतर मागे घेणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अशाच अर्थ व आशयाचे पाच अर्ज न्यायालयात सादर केले आहेत. यापूर्वीच्या या अर्जांवर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतलेला नव्हता.
त्यामुळे राहुल गांधी यांना यापूर्वीच्या अर्जांची माहिती नसल्याचे सूचित होत असून, आरोपीने त्याच्या वकिलांसोबत नियमित संपर्कात राहून आवश्यक सूचना घेतल्या पाहिजेत, या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना न्यायालयात वैयक्तिक हजर राहून स्पष्टीकरण देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती सात्यकी सावरकर यांनी विशेष न्यायालयाकडे केली.
या प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी अॅड. संग्राम कोल्हटकर यांच्यामार्फत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०५ नुसार विशेष न्यायालयाकडे अर्ज केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांची मानहानी केल्याप्रकरणी खटल्याच्या सुनावणीस वैयक्तिक हजर राहण्याचे आदेश देण्याची विनंती या अर्जात करण्यात आली आहे.
राहुल गांधी वारंवार निरर्थक व अनावश्यक अर्ज करून खटला विनाकारण लांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायदानाच्या मार्गात जाणीवपूर्वक अडथळा आणणारे हे कृत्य संसद सदस्य आणि विरोधी पक्षनेते पदाला शोभणारे नाही. त्यामुळे घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन होत आहे. राहुल गांधी अर्थहीन व अप्रस्तुत अर्ज दाखल करून खटल्याच्या सुनावणीत अडथळा आणत आहेत. त्यांनी याआधी एक अर्ज दाखल करून तो घाईगडबडीत मागे घेतला.
मात्र, तशाच आशयाचे अनेक अर्ज राहुल गांधी यांनी यापूर्वी न्यायालयात सादर केले आहेत. याबाबत आरोपीने वैयक्तिक उपस्थित राहून स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, असे सात्यकी सावरकर यांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने या अर्जावर राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांचे म्हणणे मागविले आहे. त्यावर १७ ऑक्टोबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होणार आहे.





