Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी थेट पत्र पाठवावे; निवडणूक आयोगातील सुत्रांनी मांडली भूमिका

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला थेट पत्र पाठवावे. तसे केले तरच त्यांना औपचारिक उत्तर देता येऊ शकेल, अशी भूमिका आयोगातील सुत्रांनी रविवारी मांडली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मॅच-फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल यांनी केला. मात्र, तो निवडणूक आयोगातील सुत्रांनी हास्यास्पद असल्याचे म्हणत फेटाळला. त्यावरून राहुल यांनी पलटवार केला.
निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. गंभीर प्रश्नांवर प्रतिसाद म्हणून स्वाक्षरीविना माहिती जारी करणे ही योग्य पद्धत नव्हे. काही दडवण्यासारखे नसेल; तर आयोगाने प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे राहुल यांनी म्हटले. महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील सायंकाळनंतरचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर निवडणूक आयोगातील सुत्रांनी प्रतिक्रिया दिली.
राजकीय पक्षांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी आयोगाने त्यांच्याशी संवाद प्रक्रिया सुरू केली. त्यातून स्वतंत्रपणे चर्चा करण्यासाठी सर्व ६ राष्ट्रीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले. इतर ५ पक्ष चर्चेसाठी आले. मात्र, कॉंग्रेसने १५ मे यादिवशी निश्चित झालेली बैठक रद्द केली, असे सुत्रांनी नमूद केले. सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात निवडणूक आयोगाने विशिष्ट सूचना जारी केल्या आहेत.
निवडणूक याचिका दाखल झाल्यास उच्च न्यायालय फुटेजची छाननी करू शकते. निवडणूक प्रक्रियेचा प्रामाणिकपणा, मतदारांविषयीची गोपनीय माहिती यांच्या रक्षणासाठी तशा सूचना आहेत. मतदारांच्या गोपनीयतेशी संबंधित बाबीवर राहुल आक्रमण का करू इच्छित आहेत, असा सवालही त्या सुत्रांनी केला.





