Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. तुमचे पंतप्रधान आणि तुमचे गृहमंत्री गद्दार आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. काँग्रेस पक्षानेच राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा कधी भाजप-आरएसएसचे सदस्य तुमच्याकडे येऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलतील, तेव्हा तुम्ही त्यांना उघडपणे सांगितले पाहिजे की नरेंद्र मोदी आणि अमित शाह गद्दार आहेत. भाजप आणि आरएसएस गद्दार आहेत कारण तुम्ही सर्वांनी मिळून देश विकला आहे. भाजप आणि आरएसएसने संविधान, वीरा पासी, गांधी आणि आंबेडकर यांच्यावर हल्ला केला आहे. काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी भारताची आर्थिक व्यवस्था विकली आहे… आता आर्थिक वादळ येत आहे आणि नरेंद्र मोदी आणि भारत सरकार तुम्हाला वाचवू शकणार नाहीत… ते तक्रार करतील, रडतील आणि म्हणतील की ही आमची चूक नाही. मी तुम्हाला सांगतो, चूक पूर्णपणे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएसची आहे कारण त्यांनीच ते (संविधान) नष्ट केले आहे. Rahul Gandhi : राहुल गांधींनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि गॅसची कमतरता नाही असे म्हटले जात होते. पेट्रोलचे भाव वाढणार नाहीत. आज जेव्हा पेट्रोलचे भाव वाढत आहेत, तेव्हा अंबानी भारतातून पेट्रोल निर्यात करत आहेत. अंबानी रशियाकडून पेट्रोल खरेदी करून परदेशात विकतात आणि त्या पैशातून ते नरेंद्र मोदींना निधी पुरवतात. हेच सत्य आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी देशाला परदेशात प्रवास न करण्याचे आणि सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले होते. राहुल गांधींनीही याच मुद्द्यावरून पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. रायबरेलीमध्ये ते म्हणाले, “नरेंद्र मोदी म्हणतात परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका, इलेक्ट्रिक वाहने खरेदी करा. भविष्यात शेतकऱ्यांना खत मिळणार नाही. अवघ्या काही महिन्यांतील महागाई आणि पेट्रोल, डिझेल, तेल, गॅस, डाळी आणि तांदळाच्या किमती बघा. पंतप्रधान उघडपणे सांगतात सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, तरीही ते स्वतः हजारो कोटी रुपयांच्या विमानातून परदेशात प्रवास करतात.”