Rahul Gandhi : आर्थिक संकट दाराशी, अन् पंतप्रधान परदेशात.! राहुल गांधींचा जोरदार घणाघात
मला सामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे आहे, तुमच्या घरी आणि तुमच्या लग्नाला यायचे आहे.

Rahul Gandhi – काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी आपल्या लोकसभा मतदारसंघातील बछरावां भागात एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधिक आणि अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे.
देशासमोर यापूर्वी कधीही न पाहिलेले एक भीषण आर्थिक संकट उभे ठाकले आहे, पण पंतप्रधान स्वतःच्याच काटकसरीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत विमानाने परदेश दौऱ्यांवर जात आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
इराण आणि अमेरिकेतील युद्धाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, इराणने मोक्याच्या होर्मुझची सामुद्रधुनीवर ताबा मिळवला आहे, जिथून जगातील तेलाचा मोठा पुरवठा होतो. यामुळे जगभरात तेल, डिझेल आणि खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून महागाई गगनाला भिडणार आहे.
या गंभीर परिस्थितीत पंतप्रधान देशातील नागरिकांना सोने खरेदी न करण्याचे, परदेश प्रवास टाळण्याचे आणि काटकसर करण्याचे सल्ले देतात; मात्र स्वतः लगेच विमानाने कधी नॉर्वे तर कधी जपानच्या दौऱ्यावर निघून जातात, असा टोला त्यांनी लगावला.
राहुल गांधींनी इशारा दिला की, हे आगामी आर्थिक वादळ इतके भयानक असेल की ते कोणीही रोखू शकत नाही. मात्र, याचा फटका अंबानी किंवा अदानी यांना अजिबात बसणार नाही; ते त्यांच्या कडेकोट सुरक्षा असलेल्या आलिशान राजवाड्यांमध्ये सुरक्षित राहतील.
या संकटाचा खरा फटका भारतातील शेतकरी, कामगार, तरुण आणि छोट्या व्यापाऱ्यांना बसेल, असे ते म्हणाले. सध्याच्या भाजप सरकारच्या राजवटीत मनरेगा सारख्या गरिबांच्या योजना हळूहळू मोडीत काढल्या जातील आणि सर्वसामान्य जनतेचा पैसा उद्योगपतींच्या खिशात जाईल, असा आरोपही त्यांनी केला.
तोपर्यंत महागाई थांबणार नाही
पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि नितीन गडकरी यांनी मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील एका लग्नाला हजेरी लावल्याचा संदर्भ देत गांधी म्हणाले, मला तिथल्या आलिशान सोहळ्यांना जायचे नाही.
मला सामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे आहे, तुमच्या घरी आणि तुमच्या लग्नाला यायचे आहे. जोपर्यंत हे केंद्र सरकार बदलले जात नाही, तोपर्यंत देशातील महागाई थांबणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेस जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली.





