“तुझ्या विजयाचा जयघोष दिल्लीपर्यंत स्पष्ट ऐकू येतोय” ; विनेश फोगटच्या कामगिरीवर राहुल गांधींची खास पोस्ट

Rahul gandhi on Vinesh Phogat । पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो फ्रीस्टाइल गटात धडाकेबाज कामगिरी करुन भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाटने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात विनेश फोगाटने माजी सुवर्णपदक विजेत्या आणि जगातील नामवंत मल्लांमध्ये गणना होणाऱ्या क्युबाच्या गुझमान लोपेझ हिला पराभूत केले होते. या विजयामुळे विनेश फोगाटने 50 किलो फ्रीस्टाइल गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता विनेश फोगाट ही सुवर्णपदक मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. तिच्या या कामगिरीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुझ्या विजयाचा जयघोष दिल्लीपर्यंत स्पष्ट ऐकू येतोय Rahul gandhi on Vinesh Phogat ।
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली. त्या त्यांनी, “एकाच दिवशी जगातील तीन धुरंधर पैलवानांना हरवल्यानंतर आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेश फोगाट आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष नाकारला त्यांची नियत आणि योग्यतेवर शंका उपस्थित झाल्या आहेत. त्या सर्वांना उत्तर मिळाले आहे. ज्यांनी विनेशला प्रचंड त्रास दिला त्या सत्ताधाऱ्यांची संपूर्ण यंत्रणा भारतमातेच्या या लेकीसमोर जमीनदोस्त झाली आहे. चॅम्पियन्सची हीच खासियत असते, ते मैदानातील आपल्या कामगिरीने प्रत्युत्तर देतात. विनेश तुला खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुझ्या विजयाचा जयघोष दिल्लीपर्यंत स्पष्ट ऐकू येतोय,” असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अंतिम सामन्यात विनेश फोगाट कोणाला भिडणार? Rahul gandhi on Vinesh Phogat ।
अंतिम सामन्यात विनेश फोगाटसमोर अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडचे तगडे आव्हान असणार आहे. 2020 मध्ये खेळल्या गेलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सारा हिल्डब्रँडने 50 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने चार वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या देशाला पदक मिळवून दिले होते. मात्र, विनेशने उपांत्य फेरीत सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या क्युबाच्या गुझमान लोपेझ हिचा पराभव केल्याने तिचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे.





