विनेश फोगटला पंतप्रधान मोदी फोन करणार का?

Vinesh Phogat । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगटने 50 किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव करून इतिहास रचला. यासह भारताचे पदक निश्चित झाले आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे रौप्य किंवा सुवर्णपदक निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. आता नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान तिला कॉल करून अभिनंदन करतील का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
‘पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे रौप्य किंवा सुवर्णपदक निश्चित आहे. नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान विनेश फोगाटला कॉल करतील का ? अर्थात तिचे अभिनंदन करतील का ? पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे महिला कुस्तीपटूंच्या निषेधादरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांच्याशी तुच्छतेने वागले त्या लज्जास्पद घटनेबद्दल ते माफी मागतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत मोदींवर टीका केली आहे.
या ट्विटमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 2023 मध्ये तत्कालीन रेसलर फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत आहे. महिला कुस्तीपटूंनी रेसलर फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
दरम्यान, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचे काका महावीर फोगट म्हणाले,’आम्हाला पूर्ण आशा आहे की ती सुवर्णपदक मिळवेल. ती खूप चांगली खेळली आणि यापुढेही चांगली खेळणार आहे. संपूर्ण देश आनंदी आहे.’ याशिवाय बजरंग पुनियानेही भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.





