Rahul Gandhi : राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचे गृहमंत्र्यांना पत्र

लखनौ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची वैयक्तिक सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. राहुल गांधी हे काँग्रेस आणि भारतीय राजकारणातील सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी पत्र पाठवले आहे.
अजय राय यांनी म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी भांडण केले. त्यांनी गुप्ता यांना वैयक्तिकरित्या दुखावण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुख्यमंत्र्यांसोबत त्या जनसुनावणी घेत असताना घडली. राहुल गांधींनाही एक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सामान्य जनता आणि समर्थकांशी संवाद साधण्यासाठी नेहमीच उपलब्ध राहावे लागते. त्यामुळे राहुल गांधींची सुरक्षाही वाढवली जावी.
गेल्या काही वर्षांत, त्यांनी जनतेशी थेट संवाद साधून अनेक कार्यक्रमांचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी भारत जोडो यात्रा आणि लोकसभा निवडणूक मोहीम इत्यादी प्रमुख आहेत. सध्या, राहुल गांधी बिहारमध्ये जन अधिकार यात्रेचे नेतृत्व करत आहेत. त्यामध्ये लाको नागरिक त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी जमत आहेत. या परिस्थितीत, राहुल गांधींना सर्वोच्च पातळीची वैयक्तिक सुरक्षा न चुकता पुरवणे योग्य ठरेल. राहुल गांधी यांचे प्रिय कुटुंब दहशतवादी हिंसाचाराचे बळी ठरले आहे, ज्यामध्ये सुरक्षेतील त्रुटी हे एक प्रमुख कारण आहे, म्हणून त्यांच्या सुरक्षा व्यवस्था मजबूत केल्या पाहिजेत, असेही राय यांनी शेवटी सांगितले.





