GT vs LSG : लखनौचे नवाब गुजरातवर पडले भारी! मिचेल मार्शच्या शतकानंतर विल्यम ओरोर्केचा धुमाकूळ

GT vs LSG Lucknow Super Giants defeated Gujarat Titans : लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर ३३ धावांनी पराभवाची धूळ चारली. मिचेल मार्शचे शतक आणि पूरनच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने २० षटकांत २ गडी गमावून २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला ९ विकेट गमावून फक्त २०२ धावा करता आल्या. शाहरुख खान आणि रदरफोर्ड यांनी शानदार फलंदाजी केली, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. लखनौकडून विल्यम ओरोर्केने शानदार गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या.
गुजरात टायटन्सना २३६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांची सुरुवात खूप चांगली झाली होती. शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात ४६ धावांची सलामी भागीदारी झाली, पण साई सुदर्शन २१ धावा काढल्यानंतर पाचव्या षटकात बाद झाला. शुबमन गिल देखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याने जोस बटलरसोबत ३९ धावा जोडल्या. बटलर ३३ धावा काढून बाद झाला आणि त्याच्या नंतर फक्त ११ धावा काढून शुबमन गिलही २० चेंडूत ३५ धावा काढून बाद झाला. गुजरातने ९६ धावांवर ३ विकेट गमावल्या.
A century worth the wait 🫶
Mitchell Marsh’s maiden #TATAIPL hundred earns him a well deserved Player of the Match award! 💪
Relive his innings ▶ https://t.co/aLoUHWrkIo#GTvLSG pic.twitter.com/G9A46i8ydK
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
शेरफेन रुदरफोर्ड आणि शाहरुख खानने साकारली ८६ धावांची भागीदारी –
येथून शेरफेन रुदरफोर्ड आणि शाहरुख खान यांच्यात ८६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, ज्यामुळे गुजरातने सामन्यात विजयाकडे वाटचाल सुरू केली. मात्र, ३८ धावा करून रदरफोर्ड बाद झाला तेव्हा गुजरातसाठी विजय सोपा दिसत होता. यावेळी गुजरातला २३ चेंडूत ५४ धावांची आवश्यकता होती. एकेकाळी गुजरातने ३ विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या होत्या, पण विकेट्सची घसरण अशा पद्धतीने सुरू झाली की जीटीच्या पुढील ६ विकेट्स २० धावांच्या आतच पडल्या.
हेही वाचा – Arshad Khan : लाइव्ह सामन्यात टळली मोठी दुर्घटना! एकाच षटकात दोनदा घसरुन पडला गोलंदाज, पाहा VIDEO
लखनौच्या संघाने दोन्ही विभागातही मारली बाजी –
तत्पूर्वी लखनौ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २३५ धावा केल्या होत्या. मार्करम आणि मिशेल मार्श यांनी ९.२ षटकांत ९१ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने स्फोटक फलंदाजी करत ६४ चेंडूत ११७ धावा केल्या. या खेळाडूने १० चौकार आणि ८ षटकार मारले. पूरनने २७ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या खेळाडूने ५ षटकार आणि ४ चौकार मारले. यानंतर उर्वरित काम त्यांच्या गोलंदाजांनी केले. विल्यम ओ’रोर्कने सर्वाधिक ३ आणि आवेश खानने २ विकेट्स घेतल्या. आयुष बदोनीने २ तर आकाश सिंग आणि शाहबाज अहमदने प्रत्येकी एक विकेट्स घेतली. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये, लखनौच्या गोलंदाजांनी कहर केला. या पराभवानंतरही गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र, प्लेऑफला सुरुवात होईपर्यंत टॉप-२ मध्ये टिकून राहणे अवघड झाले आहे.





