Rahul Gandhi – माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अलिकडेच एका मुलाखतीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रशंसा केली होती. राहुल गांधी आता वेगळ्या स्वरूपाचे राजकारण करत आहेत असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानामुळे सगळ्यांनाच आश्चर्य जरी वाटले असले तरी राहुल यांचे गेल्या काही काळातील बदललेले राजकारण कोणापासून लपून राहीलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या राजकारणातही मोठा बदल झाला आहे. गेल्या काही काळापासून राहुल गांधी राजकीय प्रक्रियेत आणि रणनीती ठरवण्यात अत्यंत सक्रिय झाले आहेत. कॉंग्रेस पक्षाचे पुनरूज्जीवन आणि पक्षाला पुन्हा भक्कम करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षसंघटनेत सुधारणा करणे आणि अगदी खालच्या स्तरापर्यंत पुन्हा जोडले जाण्याचे प्रयत्न आता होताना दिसत आहेत. पक्षांतर्गत सुधारणांवरही राहुल गांधी यांनी विशेष भर दिला आहे. त्याचसोबत पक्षाला आधुनिक चेहरा देण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसतो आहे. निवडणुकीच्या संदर्भातील रणनीतीत सुधारणा करण्याच्या दिशेनेही काम होताना दिसते आहे. राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावरही पक्षाला सक्षम करणे हाच यामागचा उद्देश आहे. प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करणे आणि विरोधी पक्षांची एक भक्कम आघाडी उभी करणे हेही त्याचाच एक भाग. राजकारणाच्या सुरूवातीच्या दिवसांत राहुल यांची सोशल मीडियावर यथेच्छ खिल्ली उडवली गेली. त्यांना फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही किंवा कोणी तसे घेऊही नये यासाठीही प्रयत्नपूर्वक काही बाबी केल्या गेल्या. तथापि, आता दशकभरात राहुल यांनी मोठी मजल मारली आहे. इंडिया टुडेने अलिकडेच मूड ऑफ द नेशन जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून राहुल गांधी यांच्याच नावावर जनतेने शिक्कामोर्तब केले. राहुल अद्यापही लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी यांच्या मागे असल्याचे त्या सर्वेक्षणातील आकडेवारी सांगत असली तरी भारतीय जनता पार्टी आणि अन्य सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या कितीतरी पटीने राहुल गांधी पुढे गेले आहेत. राहुल यांच्या या बदलत्या रूपाची दखल बहुतांश राजकीय विश्लेषकांना घ्यावी लागली आहे. सुरूवातीच्या टप्प्यातील राहुल यांची भाषणे आणि आताची ठोस भाषणे आणि त्यांनी आत्मसात केलेली कला या सगळ्यांचा उहापोह त्यांच्याकडून केला जातो आहे. अगोदर भारत जोडो यात्रा, त्यानंतर कुली, मोची, बस ड्रायव्हर यांच्या भेटीगाठी आणि सर्वसामान्यांती सहजपणे वावरण्याची कला त्यांना जमली असून ते एका वेगळ्या राजकारणाची परिभाषा मांडताना दिसत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर सक्रियात, भाजप विरोधात आक्रमकता, युवा वर्गाशी जोडून घेण्याचे प्रयत्न, सभागृहात सरकारला धारेवण धरणारी भाषणे असे गेल्या काही दिवसांत राहुल यांचे बदलते रूप कॉंग्रेससाठी आश्वासक आहे आणि सत्ताधारी पक्षाला अलर्ट मोडवर ठेवणारे आहे.