Rahul Dravid to continue as India head coach : राहुल द्रविड यांची मनधरणी करण्यात अखेर बीसीसीआयला यश आले आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीचा द्रविड यांच्याशी असलेला करार बीसीसीआयने वाढवला आहे. या कालावधीचा बीसीसीआयने स्पष्ट उल्लेख केला नसला तरीही आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून ते पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत द्रविडच या पदावर कायम राहतील असे संकेत दिले आहेत.
यंदाच्या नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंतच द्रविड यांचा करार होता. 2021 साली रवी शास्त्री यांचा करार संपल्यावर द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. हा करार संपल्यावर आपल्याला त्यात वाढ करण्यात रस नाही तसेच पुढील काळात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच (एनसीए) कार्यरत राहण्यास पसंती असेल, असे द्रविड म्हणाले होते. मात्र, बीसीसीआयच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते द्रविड यांचा करार वाढवण्या आला व त्याला अखेर द्रविड यांनीही मान्यता दिली. द्रविड यांच्यासह स्पोर्ट स्टाफचा करारही वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, आशिष नेहरालाही काही दिवसांपूर्वी प्रस्ताव देण्यात आला होता मात्र, त्याने नकार कळवला होता. त्यानंतर द्रविड यांची मनधरणी करण्यात आली. द्रविड यांच्याच मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. तसेच त्यांच्याच कार्यकाळात भारतीय संघ जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला होता.
सध्या द्रविड यांना विश्रांती दिली गेली असल्याने केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बदली मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, पुढील महिन्यात संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार असून या मालिकेपासून द्रविड संघासह पुनरागमन करतील.
या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20, 3 एकदिवसीय तर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच त्यानंतरही काही मालिका होणार आहेत.
भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक….
India tour of South Africa, 2023-24.
टी-20 मालिका….
पहिला सामना – 10 डिसेंबर, डर्बन
दुसरा सामना – 12 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग
एकदिवसीय मालिका…
पहिला सामना – 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरा सामना – 19 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 21 डिसेंबर, पार्ल
कसोटी मालिका…
पहिला सामना – 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरीयन
दुसरा सामना – 3 ते 7 जानेवारी, केपटाऊन
तसेच आयपीएल स्पर्धा संपल्यावर वेस्ट इंडिज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदात टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. तोपर्यंत द्रविड हे मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहतील असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.