वाडेबोल्हाईचे सुपुत्र रघुनाथ गावडे यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती

पुणे : हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई गावचे सुपुत्र रघुनाथ खंडू गावडे यांना केंद्र शासनाने आय.ए.एस. पदी पदोन्नती दिली आहे. नुकतीच त्यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली. यामुळे हवेली तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास केला. 1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. त्यानंतर महसूल विभागात त्यांनी विविध ठिकाणी काम केले. नाशिक येथे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती, शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी म्हणून तळोदा जि.नंदुरबार येथे करण्यात आली .तेथे त्यांनी प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे काम उत्कृष्टपणे केले आणि आपल्या कामाचा ठसा उमटविला.
त्यानंतर त्यांनी धुळे जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे प्रांताधिकारी,नाशिक विभागात एम.आय.डी.सी. चे प्रादेशिक अधिकारी,सन 2011 ते 2014 या कालावधीत त्यांनी अपर जिल्हाधिकारी, मालेगाव या अतिशय संवेदनशील व महत्वाच्या पदावर काम केले, तिथे त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात एकोपा वाढवण्यासाठी व समाजिक ऐक्य निर्माण होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले, त्यामुळे धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मालेगाव येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने 2014 साली दर बारा वर्षांनी होणाऱ्या नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी ‘मेळा अधिकारी’ या अत्यंत महत्वाच्या पदावर केली.
तेथील कुंभमेळा नियोजन हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व अचूक ठरले. या संपूर्ण नियोजनात कुठेही त्रुटी राहीली नाही. या उत्कृष्ट नियोजनाची दखल अमेरिका देशात देखील घेतली गेली, व या उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मध्यप्रदेश राज्याने देखील त्यांना उज्जैन येथील कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले होते.
2017-2020 या कालावधीत त्यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) व उपायुक्त (सामान्य प्रशासन) या पदावर लक्षणीय काम केले. या संपूर्ण सेवाकाळातील पंचवीस वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाची दखल घेऊन महाराष्ट्र व केंद्र शासनाने त्यांची आय.ए.एस. या प्रतिष्ठेच्या पदी पदोन्नती केली. या संपूर्ण कालावधीत त्यांना त्यांचे बंधू विठ्ठल खंडू गावडे व पत्नी रूपाली यांनी मोलाची साथ दिल्यामुळे त्यांनी हे घवघवीत यश मिळवले.
रघुनाथ गावडे यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची बाब अभिमानास्पद असून वाडेबोल्हाई व पंचक्रोशीमधील नागरिक तसेच संपूर्ण हवेली तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थांकडून त्यांच्या अविरत सेवेबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
– बापूसाहेब भोर (ग्रामस्थ, वाडेबोल्हाई)





