Pune : वकिलांनी मुद्रांक जिल्हाधिकार्यांपुढे वाचला समस्यांचा पाढा

पुणे : दस्त नोंदणी कार्यालयात मध्यस्थांचा वाढलेला सुळसुळाट, उपनिबंधकांची असहकार्याची भूमिका, कार्यप्रणातील अपुरे मनुष्यबळ, स्वच्छतागृहांची कमी संख्या, यंत्रणेतील तांत्रिक बदलांचा गोंधळ आदी समस्यांचा पाढाच कन्व्हेसिंग प्रॅक्टीस करणार्या वकिलांनी सोमवारी (दि. २८) मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांच्यापुढे वाचला.
दस्त नोंदणी करताना वकील वर्गाला येणार्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक जिल्हाधिकारी हिंगाणे यांची शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील पुणे बार असोसिएशनच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी वकिलांच्या सर्व समस्यांची माहिती घेऊन त्यावर सविस्तर चर्चा केली.
यावेळी, पुणे बार असोसिएशन व मुद्रांक प्रशासन यांमध्ये वर्षातून एकदा संवादात्मक बैठक पार पडावी, अशी भूमिका मांडण्यात आली. यावेळी, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड, उपाध्यक्ष अॅड. समीर भुंडे, सचिव अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे, सदस्य अॅड. आकाश गलांडे कन्व्हेंसिंग प्रॅक्टिस करणारे वकील व बार असोसिएशनचे माजी ऑडिटर अॅड. अजय देवकर यांसह बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





