Satara: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सोहळा प्रमुखांनी मागील वर्षी विविध कामे सांगितलेली होती. या कामांसाठी निधीची मागणी तात्काळ करुन कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा 2026 नियोजन व पालखी महामार्गावरील अडीअडचणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लोणंद पालखी तळावरील विद्युत डी.पी. हलविण्याबाबत पालखी प्रमुखांनी मागील वर्षी सांगितले होते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, हा डी.पी. विद्युत वितरण कंपनीने पालखी सोहळ्यापूर्वी इतर ठिकाणी हटवावा. लोणंद-नीरा पालखी मार्गावर वाहतुक कोंडी होते, ही वाहतुक कोंडी होणार नाही यासाठी रस्त्याच्या एकाच बाजुला खाद्य स्टॉल लावावेत. तरडगाव येथे वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने करावी. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरा नदीवर स्नान घातले जाते त्या ठिकाणीची कामेही त्वरीत सुरु करावीत. फलटण शहरात अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत. कामे पूर्ण होण्यास वेळ लागणार असून ज्या रस्त्यावरुन पालखी फलटण शहरात येते त्या रस्त्यांची कामे पालखी सोहळ्यापुर्वी पूर्ण करावीत, यासाठी आराखडा तयार करावा. पालखी सोहळ्यापूर्वी लोणंद ते बरड या मार्गावरील रस्त्यांचे ड्रोन शुटींग करावे. ज्या ठिकाणी महामार्ग खराब असेल तेथे दुरुस्ती करण्याची सूचना केली जाईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले. पाण्याचे टँकर, मोबाईल टॉयलेटची निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी. पालखी सोहळा मार्गावरील शौचालयाच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.