Radhika Road Satara : अखेर राधिका रस्त्यावरील १९ टपऱ्यांवर पालिकेचा हातोडा; अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले
Radhika Road Satara : गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेला राधिका रस्ता अखेर मोकळा; पोलिसांच्या गराड्यात पालिका कर्मचाऱ्यांची धडक कारवाई.

Radhika Road Satara – गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या राधिका रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने सोमवारी सकाळी धडक कारवाई करून, राधिका चौक ते महाराणा प्रताप चौक या दरम्यानच्या 19 अनधिकृत टपर्या हटवल्या. त्यापैकी सात टपर्या जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमुळे अनधिकृत व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, राधिका रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अनागोंदी आणि नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. समर्थ मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवल्यानंतर पालिकेचे पुढचे लक्ष्य राधिका रस्ता असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विरोधी विभागाचे निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली दहा कर्मचार्यांचे पथक,
दोन जेसीबी अशी यंत्रणा सोमवारी सकाळी 10.30 वाजता राधिका रस्त्यावर दाखल झाली. पालिकेच्या कारवाईची माहिती मिळताच, अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून टपर्या हटवायला सुरुवात केली. राधिका चौक, बारटक्के कॉर्नर ते महाराणा प्रताप चौक या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या टपर्या हटवण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांनंतर हा रस्ता मोकळा झाल्याचे पाहायला मिळाले.
या कारवाईत सात टपर्या जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशांत निकम यांनी दिली. दरम्यान, दुपारनंतर पालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात मार्केट यार्डसमोरील गंमतजंमत दुकानाच्या परिसरातही कारवाईचा बडगा उगारला. काही अनधिकृत टपर्या हटवताना अतिक्रमणधारक आणि कर्मचार्यांमध्ये वादावादी झाली. काही दिवसांपूर्वी गंमतजंमत वाइन शॉपच्या परिसरात एका युवतीच्या विनयभंगाची घटना घडली होती.
त्यामुळे या रस्त्यावरील अनधिकृत टपर्या, अंधारे कोपरे, हा चर्चेचा विषय झाला होता. या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. अखेर पालिकेने धडक मोहीम राबवून, अतिक्रमणांवर हातोडा चालवला. या मोहिमेनंतर राधिका रस्ता मोकळा झाल्याचे दिसत असले, तरी या रस्त्यावरील अनधिकृत ट्रक टर्मिनस आणि अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर वाहतूक व्यवस्थेसंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पालिकेची ही मोहीम पुढेही सुरू राहणार का, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.






